श्रावणातील तिसऱ्या सोमवारी अभिषेक पुजा, भजनसंध्या आणि महाप्रसादाचा भक्तिमय सोहळा
अनुज वरटकर
प्रतिनिधी /घोराड
श्री क्षेत्र घोराड येथील नाग मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासुनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असुन, सायंकाळी श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सकाळी नाग मंदिरात विधिवत अभिषेक पुजा करण्यात आली. त्यानंतर महादेवाची गाणी व पारंपरिक भक्तिगीते सादर करण्यात आली. दुपारी चार वाजता भाविकांना कढई प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजल्यापासुन पद्मश्री राधे यांच्या भजनसंध्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भजनांच्या सुरांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासुन श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरात महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी देऊन सहकार्य केले. भाविकांच्या योगदानातून दरवर्षी हा धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतो. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली असुन, उशिरा रात्रीपर्यंत महाप्रसाद वितरण सुरू होते.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र घोराडमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

