प्रतिनिधी/दहेगाव (गोसावी)
ग्रामपंचायत दहेगाव (गो), ता. सेलू, जि. वर्धा येथे बनावट ग्रामसभा ठराव तयार करून खानपट्ट्यासाठी ना-हरकत दाखला (NOC) देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असुन, या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष ग्रामसभेत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली.
दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांच्या उपस्थितीत दहेगाव (गो) येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत सरपंचांनी सादर केलेल्या विकास आराखड्यासह खानपट्ट्यासाठी देण्यात आलेल्या NOC प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. यावेळी कथित बनावट ठराव व भ्रष्टाचाराचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने ग्रामसभा चांगलीच गाजली.
मासिक सभेचा ठराव ग्रामसभेचा म्हणुन वापरल्याचा आरोप
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा किन्हाळा येथील सर्वे नं. 26/1/2, क्षेत्र 2.00 हेक्टर आर मधील श्रीमती कल्पना मडावी यांच्या खानपट्ट्यासाठी ग्रामपंचायतीने ना-हरकत दाखला दिला होता. या प्रक्रियेसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असताना, दि. 20 मे 2026 रोजीच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक 7 हा दि. 29 मे 2026 रोजीच्या ग्रामसभेचा ठराव असल्याचे दाखवुन कथितरीत्या खोटा ठराव तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रोसिडिंग बुकमध्ये खोडतोड झाल्याचा दावा
या प्रकरणाची पंचायत समितीच्या चौकशी समितीने दखल घेत दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी तब्बल आठ रजिस्टर जप्त केल्याचे सांगण्यात आले. तपासणीदरम्यान प्रोसिडिंग बुकमध्ये खोडतोड तसेच वेगवेगळ्या शाईचा वापर झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष ग्रामसभेत या गंभीर आरोपांबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने दहेगाव (गो) व किन्हाळा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यानंतर समस्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली.
पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी क्रमांक 154, दि. 31 ऑगस्ट 2026 अन्वये तक्रारीची नोंद करण्यात आल्याचे तक्रारदारांनी सांगितले. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336(3) व 340 अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, मुळ प्रोसिडिंग बुक जप्त करावे तसेच संबंधित खानपट्ट्यांचे NOC रद्द करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुरावे सादर करणार
या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित प्रोसिडिंग बुकचे फोटो, व्हिडिओ, पंचनामा तसेच NOC पत्रांसह सर्व पुरावे आमदार मा. समीर कुणावार यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
विशेष ग्रामसभेला पटवारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक तसेच दहेगाव (गो) व किन्हाळा येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे.

