गोधनी रेल्वेतील गॅस गळतीप्रसंगी जीवाची पर्वा न करता नागरिकांचे केले संरक्षण; मानकापुर पोलिसांचा महिलांकडुन सत्कार
विशेष प्रतिनिधी
नागपुर:
गोधनी रेल्वे येथील फागोजी ले-आऊट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात कोरीन गॅसची गळती झाल्याने रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर परिस्थितीत मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जलशुद्धीकरण केंद्राच्या सुमारे २०० मीटर परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविले.
या बचावकार्यादरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत संपूर्ण घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व त्यांच्या पथकाच्या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
पोलिसांनी दाखविलेल्या धाडसाची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत आनंदी ग्राम संघ व जिजाऊ महिला ग्राम संघातील महिलांनी पोलीस बांधवांचा विशेष सत्कार केला. यावेळी महिला सदस्यांनी पोलिसांना सुरक्षा धागा अर्थात रक्षा धागा (राखी) बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाल व श्रीफळ देऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात आनंदी ग्राम संघाच्या अध्यक्षा सारिका संजय सोनटक्के तसेच जिजाऊ महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा विजया चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी रजनी ठाकरे, गंगा मेश्राम, मीरा मुन, वैशाली खोब्रागडे, रीना पाटील यांच्यासह अन्य महिला सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचा गौरव केला.
गॅस गळतीच्या संकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून आलेल्या मानकापूर पोलिसांप्रती महिलांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.


