पोळ्यासाठी बैठकांचे सत्र; सूचनांच्या अंमलबजावणीचा मात्र बोजवारा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे : विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सिंदी रेल्वेच्या ऐतिहासिक तान्हा पोळा महोत्सवाच्या नियोजनासाठी दरवर्षी बैठका घेतल्या जातात. आमदार समीर कुणावार स्वतः पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांना सुचना देतात; मात्र बैठकीत मान डोलावणारे अधिकारी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र उदासीन असल्याचा आरोप सिंदीवासीयांकडुन होत आहे.
यावर्षी १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत रस्ते दुरुस्ती, वाहनतळ, प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही, महिला सुरक्षा, पोलीस बंदोबस्त आदी महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र महिना उलटूनही अनेक कामांना सुरुवात झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
१५० वर्षांहुन अधिक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पोळ्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक येतात. वाढती गर्दी, अरुंद रस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
पोळा महोत्सव जवळ आला तरी शहरात येणाऱ्या रस्त्यांची अवस्था जैसे थे असल्याने सिंदीकरांचा सवाल आहे
“बैठका भरपुर झाल्या, पण सूचनांची अंमलबजावणी कधी होणार?”
ऐतिहासिक तान्हा पोळ्याचा वारसा जपण्यासाठी प्रशासनाने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कामाला लागावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

