उमरेडच्या बायपास चौकात भीषण अपघात; कार-दुचाकींचे नुकसान, महिला व विद्यार्थिनी जखमी
उमरेड : शहरातील बायपास चौकात सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव टिप्परने उमरेड आगाराच्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याने बसचा मार्ग अचानक बदलला आणि ती रस्त्यालगतच्या दुकानासमोर जाऊन घुसली. या अपघातात एक महिला व एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती असून कार आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 40 N 7571 क्रमांकाची उमरेड आगाराची बस सकाळी सहा वाजता उमरेड येथून गिरडच्या दिशेने निघाली होती. बस बायपास चौकातील सिग्नल ओलांडून गिरडकडे जात असताना भिवापूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या MH 40 CX 1951 क्रमांकाच्या टिप्परने बसला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की बसचा मार्ग बदलला. बस थेट चौकातील रविकांत वाघमारे यांच्या घरासमोरील परिसरात घुसली. यावेळी तेथे उभ्या असलेल्या दुचाकी व कारला बसची धडक बसल्याने वाहनांचे नुकसान झाले.
अपघाताच्या वेळी बसमध्ये केवळ चार प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत बसमधील एक महिला आणि एक विद्यार्थिनी जखमी झाली असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
भरधाव वाहनांमुळे बायपास चौकातील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

