शिवशाही न्युज नेटवर्क
विशेष लेख
आजच्या आधुनिक युगात तरुणाईच्या विचारसरणीवर सोशल मीडिया आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा मोठा प्रभाव पडत आहे. नाती जोडणे सोपे झाले असले तरी ती प्रामाणिकपणे निभावणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे ही मोठी आव्हानात्मक बाब बनली आहे.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी २२ ऑक्टोबर रोजी तरुणांना दिलेला संदेश याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. “गर्लफ्रेंड बनवली तर दिलेला शब्द पाळा आणि लग्नापुर्वी कमवायला शिका,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. प्रेमाच्या नावाखाली कोणाच्याही भावनांशी खेळु नये आणि नाते स्वीकारले असेल तर त्याची जबाबदारीही स्वीकारावी, हा त्यांच्या संदेशाचा गाभा आहे.
प्रेमासोबत आर्थिक स्वावलंबन आणि मानसिक परिपक्वताही आवश्यक आहे. स्वतःच्या पायावर उभे न राहता मोठे निर्णय घेतल्यास भविष्यात आर्थिक व कौटुंबिक संघर्ष निर्माण होऊ शकतो.
विशेषतः अल्पवयीन मुलींचे प्रेमाच्या नावाखाली शोषण करून त्यांना वाऱ्यावर सोडण्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी नैतिक मूल्ये, कायद्याची जाणीव आणि महिलांचा सन्मान यांची शिकवण आवश्यक आहे.
शिक्षणसंस्थांनीही केवळ पदवी आणि करिअरपुरते शिक्षण न देता चारित्र्य, संस्कार, जबाबदारी आणि कुटुंबव्यवस्थेचे भान निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे; तर आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता होय.
