वर्षभर बातम्यांसाठी पत्रकारांचा शोध; दिवाळी जाहिरातींची वेळ येताच अनेकजण ‘नॉट रिचेबल’!
स्थानिक पत्रकारितेच्या आर्थिक पाठबळाचा प्रश्न ऐरणीवर; प्रसिद्धी आणि सहकार्य यांचा मेळ कधी जमणार?
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्षभर आपल्या कामाची, विकासकामांची, सामाजिक उपक्रमांची आणि विविध कार्यक्रमांची प्रसिद्धी व्हावी म्हणून पत्रकारांची आठवण ठेवणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि व्यावसायिक दिवाळीच्या जाहिरातींचा विषय निघताच मात्र अचानक गायब होत असल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यात दिसुन येत आहे. बातमी प्रसिद्ध करायची असेल तेव्हा वारंवार फोन करणारे अनेकजण जाहिरातींची वेळ आली की ‘नंतर बोलु, ‘पाहु’, असे सांगत वेळ मारून नेत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रसिद्धीसाठी हवी पत्रकारांची साथ!
वर्षभर एखादा उद्घाटन सोहळा असो, वाढदिवस असो, भुमिपुजन असो, सामाजिक उपक्रम असो किंवा अन्य कार्यक्रम, आपल्या कार्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हावी यासाठी पत्रकारांकडे आवर्जुन पाठपुरावा केला जातो. काहीजण तर बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वीच फोन करून खात्री करून घेतात. आपल्या प्रसिद्धीसाठी हजारो रुपये खर्च करून जाहिरात फलक लावणारेही अनेकजण आहेत. मात्र, स्थानिक पत्रकारांच्या दिवाळी विशेषांकासाठी जाहिरात देण्याची वेळ आली की याच मंडळींचा उत्साह मावळतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
पत्रकारितेच्या पाठीशी उभे राहण्याची गरज!
पत्रकार केवळ बातम्या प्रसिद्ध करीत नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, अन्याय-अत्याचार, प्रशासनातील त्रुटी आणि विकासकामांचा लेखाजोखा समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. अनेकदा स्वतःचा वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करून ग्रामीण भागातील पत्रकारिता जिवंत ठेवली जाते. अशा पत्रकारांना जाहिरातींच्या माध्यमातुन सहकार्य करणे ही केवळ आर्थिक मदत नसुन स्थानिक माध्यमांच्या
अस्तित्वाला बळ देणारी बाब आहे.
हंगामी पत्रकारितेचा फटकाही नियमित वार्ताहरांना!
दिवाळी, वर्धापनदिन किंवा जाहिरातींच्या हंगामातच वृत्तपत्र हातात घेऊन जाहिरातींसाठी धावपळ करणारे काहीजण, तसेच सोशल मीडियावर स्वतःला संपादक म्हणून सादर करणाऱ्या घटकांमुळेही नियमितपणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसमोर वेगळीच स्पर्धा निर्माण होत आहे. वर्षभर जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पत्रकारांना मात्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रसिद्धीच्या वेळी आपले, सहकार्याच्या वेळी परके का?
प्रत्येकाने जाहिरात द्यावीच, असा कोणताही आग्रह नाही. आर्थिक परिस्थितीची जाणीव पत्रकारांनाही आहे. मात्र, वर्षभर प्रसिद्धीसाठी पत्रकारांची गरज भासते, तर त्यांच्या दिवाळी विशेषांकाच्या वेळी किमान प्रतिसाद देण्याची अपेक्षाही पुर्ण होऊ नये, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातुन प्रसिद्धी मिळविणाऱ्यांनी स्थानिक पत्रकारितेच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा. कारण माध्यमे टिकली तरच समाजातील प्रश्नांना वाचा फुटेल!
दिवाळीच्या प्रकाशपर्वात पत्रकारांच्या दिवाळी विशेषांकावर जाहिरातींच्या दुष्काळाचे सावट राहणार की समाजातील प्रतिष्ठित मंडळी सहकार्याचा हात पुढे करणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
