सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपुर्ण निरीक्षण!
दोन अपत्यांच्या अटीवरून देशभरात नव्या चर्चेला उधाण; २००३ मधील ऐतिहासिक निर्णयाचा फेरविचार होणार
शिवशाही न्युज नेटवर्क
दिल्ली
दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवणाऱ्या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपुर्ण निरीक्षण नोंदवले आहे. देशातील बदलती लोकसंख्या आणि घटता प्रजनन दर लक्षात घेता दोन अपत्यांच्या अटीची आवश्यकता आता संपली आहे का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
न्यायमुर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमुर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना दोन अपत्यांच्या धोरणामागील तत्कालीन परिस्थिती आणि सध्याची लोकसंख्या यांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. तसेच या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘जावेद विरुद्ध हरियाणा राज्य’ या प्रकरणात दोन अपत्यांच्या अटीला घटनात्मक मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर देशातील लोकसंख्येच्या परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. त्यावेळी देशाचा प्रजनन दर ३ होता, तो आता १.९ वर आल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणुन दिले.
महाराष्ट्रातील प्रकरणामुळे विषय चर्चेत
महाराष्ट्रातील काकोडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगला भीमराव इंगळे यांना तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४ (१) (जे-१) नुसार अपात्र ठरवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांची अपात्रता कायम ठेवली होती. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
दोन अपत्यांच्या अटीमुळे नागरिकांच्या निवडणुक लढवण्याच्या अधिकारावर मर्यादा येतात का, तसेच प्रजनन स्वायत्ततेच्या मुलभुत अधिकाराचा प्रश्न यावेळी न्यायालयाने उपस्थित केला.
मात्र, अद्याप कायदा रद्द झालेला नाही!
सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचा फेरविचार करण्यासाठी प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. त्यामुळे दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तींना निवडणुक लढवण्याची सरसकट मुभा मिळाली, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. अंतिम निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन अपत्यांची अट कायम राहणार की बदलत्या काळानुसार या कायद्यात बदल होणार, याबाबत आगामी न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
