अनुज वरटकर | विशेष प्रतिनिधी
सेलु तालुक्यातील श्री क्षेत्र घोराड येथील जगदंबा माता मंदिरात चैत्र पंचमी निमित्त महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराज मंदिराच्या मागील परिसरातील जगदंबा माता मंदिरात आज दि. ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी मंदिरात मातेची आरती व पुजा मंदिर चे पुजारी संजय दुर्गे यांच्या हस्ते पार पडली. दुपारी महिला भजन मंडळाच्या वतीने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर काल्याचे भजन तसेच काला वितरण करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजल्यापासुन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
स्थानिक रहिवासी व मातेचे भक्त यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. येथे दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. चैत्र पंचमी निमित्तही अशाच प्रकारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
भाविकांनी भक्तीमय वातावरणात महाप्रसादाचा आस्वाद घेत आनंदोत्सव साजरा केला.


