विशेष प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची व निंबोणी परिसरात एका अल्पवयीन 14 वर्षे मुलीचा बालविवाह झाला. यानंतर चार महिन्यातच अल्पवयीन नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. यातून अल्पवयीन नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. याबाबत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये अल्पवयीन मुलीच्या पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्यांना सध्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिकचा तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांचे पथक करत आहे. मात्र चार महिन्यापूर्वी या बालविवाहास कोण कोण जबाबदार होते या सर्वांवर तातडीने कारवाई केली तरच असे धक्कादायक प्रकार पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी होऊ लागली आहे.

