🔥डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेची प्रकृती धोक्यात
🔥सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला
दिनेश घोडमारे
सिंदी (रेल्वे) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शबाना खान यांचा हलगर्जीपणा आणि केंद्रातील एका निलंबित कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेतील हैदोस यामुळे आरोग्य केंद्राची सुरक्षा आणि व्यवस्था ऐरणीवर आली आहे. एका गरोदर महिलेला उपचारासाठी वेळेवर हजर न राहणे आणि कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना १६ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी रेल्वे येथील मिताली अतुल कांबळे ही दोन महिन्यांची गरोदर महिला १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रकृती बिघडल्याने आरोग्य केंद्रात आली होती. त्यावेळी डॉ. शबाना खान यांनी तिची तपासणी करून औषधोपचार दिला. मात्र, सायंकाळी ७.४५ च्या सुमारास मितालीची प्रकृती पुन्हा खालावली. शेजारी राहणारे शिक्षक सचिन मेंढे यांनी तिला तातडीने पुन्हा आरोग्य केंद्रात आणले. त्यावेळी केंद्रात दोन कर्मचारी उपस्थित होते, मात्र डॉ. खान तिथे नव्हत्या. कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन करूनही त्या आल्या नाहीत. शेवटी सचिन मेंढे यांनी स्वतः जाऊन डॉक्टर खान यांना विनवणी केली असता, “तिला ओ.आर.एस. चे पाणी पाजा आणि घरी घेऊन जा,” असा अजब सल्ला देऊन त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप होत आहे.
सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला
आरोग्य केंद्रात ही धावपळ सुरू असतानाच, असंसर्ग आजार विभागातील निलंबित कर्मचारी सचिन मेंढे याने दारूच्या नशेत धुमाकूळ घातला. त्याने तेथे तीन महिन्यांपासून कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक किशोर नागोराव कुकरे यांच्यावर विटेने हल्ला केला. ही वीट त्यांच्या ओठाला लागून ते थोडक्यात वाचले. एवढ्यावरच न थांबता, त्या कर्मचाऱ्याने कुकरे यांचा दुप्पट्याने गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तेथे उपस्थित असलेले रुग्ण राजू बावणे यांनी मध्यस्थी करत कुकरे यांना वाचवले.
महिला कर्मचाऱ्यांची असुरक्षितता
धक्कादायक बाब म्हणजे, रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या आरोग्य सेविका स्नेहा धनविजय यांनीही संबंधित मद्यधुंद कर्मचाऱ्याच्या गैरवर्तणुकीबाबत डॉ. शबाना खान यांना त्याच दिवशी तक्रार केली होती. मात्र, डॉक्टरनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. अखेर आरोग्य कर्मचारी धम्माणंद जांबूरकर यांनी स्थानिक पोलिसांना पाचारण करून या घटनेची माहिती दिली.
डॉक्टरांच्या चौकशीची आणि निलंबनाची मागणी
डॉ. शबाना खान या गेल्या दोन वर्षांपासून येथे कार्यरत असून, ओपिडी मध्ये उशिरा येणे वारंवार निवासस्थानात जाऊन अराम करणे, रुग्ण बोलाविण्यास गेल्यास रुग्णांशी उद्धटपणे बोलणे, धमकावणे आणि कर्मचाऱ्यांना त्रास देणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“आरोग्य केंद्रात एका गरोदर महिलेची प्रकृती खालावलेली असताना डॉक्टरांनी दाखवलेली असंवेदनशीलता अत्यंत क्लेशदायक आहे. मी स्वतः डॉक्टरांकडे विनवणी करायला गेलो होतो, पण त्यांनी केंद्रात येण्याऐवजी घरी जाण्याचा अजब सल्ला दिला. एका बाजूला रुग्ण मदतीसाठी व्याकुळ होते, तर दुसरीकडे मद्यधुंद कर्मचाऱ्याचा हैदोस सुरू होता. आरोग्य केंद्रात ना सुरक्षा राहिली आहे, ना जबाबदारी. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात सामान्य रुग्णांचे हाल होणार नाहीत.”
सचिन मेंढे
शिक्षक, केसरीमल नगर विद्यालय सिंदी (रेल्वे).
“ही घटना अत्यंत गंभीर असून आरोग्य विभाग याची दखल घेत आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी मी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम वरठी यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त होताच, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे आणि त्यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही.”
डॉ. स्वप्नील बेले
जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

