जिल्हा प्रतिनिधी
नांदेड
नांदेड शहरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना खेळण्याच्या उद्देशाने पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात उतरलेल्या चार निष्पाप मुलांचा बुडुन मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या
माहितीनुसार, शहरातील इस्लामपुरा परिसरात महानगरपालिकेकडुन नाल्याचे काम सुरू होते. या कामासाठी सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता आणि त्यात सांडपाणी साचले होते. शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या मुलांनी पाण्याची खोली न ओळखता त्यात प्रवेश केला. मात्र काही क्षणातच ते खोल पाण्यात अडकले आणि बाहेर येऊ शकले नाहीत.
या दुर्दैवी घटनेत मृत मुलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
मोहम्मद अदनान मोहम्मद फेरोज (वय १०),
मोहम्मद अली मोहम्मद इद्रीस (वय १३), इरफान सय्यद फेरोज (वय १३),
अयान इब्राहिम बगवान (वय ११)
मुलांच्या आरडाओरड ऐकुन स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी धावले, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, इतक्या मोठ्या आणि धोकादायक खड्ड्याजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता काम सुरू ठेवल्यामुळे प्रशासन व कंत्राटदारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

