🔥 पावसाचा लहरीपणा अन् कंपन्यांचे दुर्लक्ष!
दिनेश घोडमारे
प्रतिनिधी/सिंदी रेल्वे
सिंदी (रेल्वे): एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे विमा कंपन्यांची अनास्था, अशा दुहेरी संकटात सिंदी रेल्वे परिसरातील बळीराजा अडकला आहे. हजारो रुपये खर्च करून पिकांचा विमा उतरवल्यानंतरही, प्रत्यक्ष नुकसान भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांच्या हाती केवळ ‘शुन्य’ येत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सिंदी परिसरातील कापुस, सोयाबीन आणि तुर उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीकविमा योजनेचा हप्ता भरला होता. विमा कंपन्या हप्ते घेताना तत्परता दाखवतात, मात्र जेव्हा अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते, तेव्हा प्रशासकीय पातळीवर कमालीची शांतता दिसते, असा आरोप स्थानिक शेतकरी संघटनांकडुन केला जात आहे. मागील हंगामात सिंदी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाने मोठे नुकसान केले होते. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे सुपीक शेतजमीन खरडुन गेली, तर काही ठिकाणी कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पीक हातचे गेले. मात्र, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष बांधावर न पोहोचल्याने अनेक शेतकरी मदतीपासुन वंचित राहिले आहेत.
विमा कंपन्या आणि कृषी विभाग एकमेकांकडे बोट दाखवुन वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत. नुकसान भरपाई न मिळाल्याने खरीप हंगामातील बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च कसा भागवायचा, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. प्रलंबित पीकविम्याचे दावे तातडीने निकाली काढुन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी. येत्या काही दिवसांत जर विमा कंपन्यांनी ठोस पावले उचलली नाहीत, तर सिंदी परिसरातील शेतकरी तिव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहुन शेतकऱ्यांची आर्थिक विस्कटलेली घडी सावरणे आता गरजेचे झाले आहे.

