यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केवळ ‘मटण नीट शिजले नाही’ या क्षुल्लक कारणावरून पतीने मित्रासमोर पत्नीचा घोर अपमान केला. या अपमानाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने विष पिऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. या घटनेत चेतना मनोज जाधव (वय ३३) या विवाहीत महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतनाचा पती मनोज जाधव याने आपल्या एका मित्राला घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. यावेळी त्याने चेतनाला ‘मटणाची भाजी झणझणीत आणि चविष्ट बनव’ अशी ताकीद दिली होती. अंगणात जेवणाची पंगत बसली असताना, मटण व्यवस्थित शिजले नसल्याचे कारण पुढे करत मनोज याने पाहुण्यासमोरच चेतनासोबत मोठा वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ जेवणापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोज याच्या जुन्या संशयी स्वभावाची आणि दारूच्या व्यसनाचीही भर पडली.
विशेष म्हणजे, मनोज याला दारूचे मोठे व्यसन होते. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या आणाभाकांवर चेतनाने त्याला माफ करून पुन्हा नव्याने सुरुवात केली होती. मात्र, बुधवारी भरल्या ताटावरून मित्रासमोर झालेल्या अपमानाने चेतना आतुन पूर्णपणे कोलमडुन गेली. ती तडक उठुन घरात गेली आणि तिने विषारी औषध प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले. बाहेर येऊन जेव्हा तिने नवऱ्याला हे सांगितले, तेव्हा घरात एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासुन तिला मृत घोषित केले.
या अनपेक्षित घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती आणि त्यांचा आक्रोश मन हेलावुन टाकणारा होता. या प्रकरणी चेतनाचे मामा मनोहर राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी मनोज जाधव याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली आहे. या संपुर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर या करत आहेत.
मत: समाजात व्यसनाधीनता आणि संशयी स्वभाव कुटुंबाचा कसा नाश करू शकतो, याचे हे विदारक उदाहरण आहे. क्षुल्लक कारणावरून एका हसत्या खेळत्या संसाराची झालेली ही राखरांगोळी समाजासाठी नक्कीच चिंताजनक आणि विचार करायला लावणारी बाब आहे.

