🔥 लोकप्रतिनिधींच्या अनास्थेविरोधात गावकऱ्यांचा संताप!
दिनेश घोडमारे
सिंदी (रेल्वे):
कोरोनाकाळाचे सावट संपुन आता सहा वर्षांचा काळ लोटला आहे. जनजीवन पूर्णपणे पुर्वपदावर आले असतानाही, रेल्वे प्रशासनाने सिंदी (रेल्वे) स्थानकावर मागील ३० वर्षांपासून असलेल्या हावडा–कुर्ला शालिमार एक्सप्रेस (१८०३० अप / १८०२९ डाऊन) या गाडीचा थांबा अद्यापही सुरू केलेला नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सिंदी परिसरातील जनतेमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे.
शालीमार एक्सप्रेस ही सिंदी येथील प्रवाशांसाठी जिवन वाहिनी मानली जात होती. दररोज शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे विद्यार्थी, पोटापाण्यासाठी प्रवास करणारे कामगार आणि व्यवसायानिमित्त नागपुर-मुंबई जोडले गेलेले व्यापारी यांना या गाडीचा मोठा आधार होता. मात्र, कोव्हिड-१९ च्या काळात तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आलेला हा थांबा पुन्हा सुरू न झाल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे आणि त्यांचा वेळही वाया जात आहे.
लोकप्रतिनिधींची ही उदासीनता जनतेच्या विश्वासाला तडा देणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. सिंदी येथील सामान्य नागरिकांनी आता आक्रमक भुमिका घेतली आहे. संबंधित रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालुन शालीमार एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर लोकप्रतिनिधींना हा थांबा मिळवुन देणे शक्य नसेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे. जेणेकरून आम्ही प्रशासनाकडुन कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही. केवळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभुल करणे आता थांबवावे, अशा कडक शब्दांत गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
आता या विषयावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते आणि स्थानिक नेतेमंडळी या संतापाची दखल घेतात का, याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. थांबा न मिळाल्यास आगामी काळात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असूनही दुर्लक्ष?
सध्या केंद्रात आणि राज्यात एकाच विचारधारेचे सरकार असताना, ‘गल्लीपासुन दिल्लीपर्यंत’ एकछत्री सत्ता असुनही सिंदीच्या या मुलभुत प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. निवडणुकीच्या वेळी मतांचे दान मागणारे नेते आता जनतेच्या हक्काच्या थांब्यासाठी साधे पत्रव्यवहार का करत नाहीत असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

