राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे येथील परसोडी परिसरात प्रस्तावीत MIDC प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तिव्र आंदोलन छेडले असुन, प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन “जिव देऊ पण जमीन देणार नाही”, “भिक नको, हक्काचे मोल द्या”, *MIDC ला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध*अशा घोषणा देत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
मोबदल्यावरून वाद चिघळला
परसोडी परिसरातील जमीन अतिरिक्त बुटीबोरी MIDC प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शासनाकडुन जाहीर करण्यात आलेला मोबदला अत्यल्प असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्याचा दर हा बाजारमुल्याच्या तुलनेत खुपच कमी असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सिंदी रेल्वे व ड्राय पोर्टमुळे वाढले महत्त्व
सिंदी रेल्वे, परसोडी हा भाग सध्या जलद गतीने विकसित होत असुन, परिसरात मोठ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.
सिंदी येथे प्रस्तावित ड्राय पोर्ट (Multimodal Logistics Park)
बुटीबोरी MIDC चा मोठा विस्तार
समृद्धी महामार्गाची जवळीक
रेल्वे कनेक्टिव्हिटी
या सर्व कारणांमुळे या भागाचे औद्योगिक व व्यापारी महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत या परिसरातील जमीन किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
“कमी दरात जमीन घेण्याचा प्रयत्न”
आंदोलक शेतकऱ्यांनी आरोप केला की, शासनाकडुन कमी दर जाहीर करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, परिसरात सुरू असलेल्या औद्योगिक विकासामुळे जमीन किंमत आधीच वाढलेली आहे. त्यामुळे योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही, अशी ठाम भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला.
यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर मोबदला वाढवुन न्याय्य दर जाहीर केला नाही, तर आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.
विकास विरुद्ध शेतकरी हक्क
एकीकडे औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी कमी दरात घेण्याचा प्रयत्न होत असल्याने विकास आणि शेतकरी हक्क यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

