काँग्रेस अध्यक्षांच्या प्रतापाने तालुक्यात खळबळ
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : – येथील शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या जागा विक्री प्रकरणात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असुन, केवळ ६००चौरस मीटर जागा विकण्याची परवानगी असताना तब्बल २७०० चौरस मीटर जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष व सद्यस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मिश्रा यांच्यासह संचालक गणपत वांदिले, वसंतराव तेलरांधे व माजी व्यवस्थापक मुरलीधर ठाकरे यांच्यावर सेलु पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हा दाखल होताच चारही आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असुन यात बेकायदेशीर विक्री प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुरेश बाबु जयस्वाल यांनी संबधित विभागाकडे निवेदनातुन केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पणन संचालक, पुणे यांनी सदर संस्थेची केवळ ६०० चौरस मीटर जागा विकण्यास परवानगी दिली होती. मात्र, या परवानगीचा गैरफायदा घेत तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र मिश्रा यांनी संगनमताने तब्बल २७०० चौरस मीटर जागेची विक्री केली. विशेष म्हणजे ही जमीन आपल्या नातलगाच्याच नावावर -यवतमाळ येथील विजय रांका यांच्या नावे खरेदी दाखविण्यात आली.
या संपुर्ण व्यवहारात तत्कालीन दुय्यम निबंधक राजेंद्र मिसाळ, तहसीलदार महेंद्र सोनोने, मंडळ अधिकारी दिलीप मुडे व तलाठी उमाकांत टोळ यांच्याशी संगनमत करून २८ जुलै २०१५ रोजी विक्री प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारात कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता व्यवहार मंजुर करण्यात आला.
*भाड्याच्या नावावर ‘कमाईचा गोरखधंदा’*.!
विक्री केलेल्या जागेवर प्रत्यक्ष मालकी हक्क मात्र राजेंद्र मिश्रा यांचाच असल्याचे सांगितले जात आहे. ही जागा त्यांनी आधी एका खासगी कंपनीला, तर सध्या पाणीपुरवठा कंत्राटदाराला भाड्याने दिली असुन, त्या माध्यमातुन मिळणाऱ्या भाड्यावरही तेच ताबा ठेवत असल्याची शहरात खमंग चर्चा आहे.
‘”रहिवासी दाखला”ही बनावट?
खरेदीदार विजय रांका हा यवतमाळचा रहिवासी असतानाही त्याला सेलु
येथील रहिवासी असल्याचा दाखला देण्यात आल्याची बाबही याप्रकरणात चांगलीच संशयास्पद ठरत आहे.
बेकायदेशीर विक्री प्रकरणात अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी.!

या प्रकरणात केवळ संचालक मंडळचं नव्हे, तर संबंधित तत्कालीन तहसीलदार, दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी सेलु येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश बाबु जयस्वाल यांनी केली आहे.
या संपुर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकुर करीत असून, या घोटाळ्यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग असुन कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

