सेलु/प्रतिनिधी :
जनतेच्या सेवेसाठी सुरू केलेली ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे आता थेट लुटीचे अड्डे बनल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रेट लिस्ट लावणे बंधनकारक असतानाही अनेक केंद्रांवर ती गायब असुन, नागरिकांकडुन उघडपणे मनमानी पैसे उकळले जात आहेत.
नियमांचा बळी — नागरिकांचा छळ!
शासनाचे स्पष्ट आदेश धाब्यावर बसवुन केंद्रचालक सर्रास २ ते ३ पट शुल्क आकारत आहेत. नागरिकांना अधिकृत दरांची माहितीच नसल्याने त्यांच्या खिशावर सरळ डल्ला मारला जातोय.
फोटोकॉपीपासुन ऑनलाइन सेवांपर्यंत ‘लुट पॅकेज’
फोटोकॉपीसाठी ५ रुपये, ऑनलाइन अर्जांसाठी अवाजवी ‘सर्व्हिस चार्ज’, प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त पैसे — सेवा केंद्रांमध्ये लुटीचा ‘फुल पॅकेज’ सुरू आहे. बाहेर स्वस्त असलेल्या सेवा इथे दुप्पट-तिप्पट दराने दिल्या जात आहेत.
गरीबांवरच टार्गेट — आवाज दाबला जातोय
ग्रामीण आणि कमी शिक्षित नागरिकांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. “काम अडेल” या भीतीने लोक गप्प बसुन जास्त पैसे देत आहेत.
प्रशासनाची संशयास्पद शांतता
अधिकृत पावती न देणे, नियमांचे उल्लंघन – सगळं सुरू असुनही कारवाई शून्य! प्रशासनाच्या या शांततेमुळे संगनमताचा संशय व्यक्त होत आहे.
जनतेचा इशारा — आता पुरे!
रेट लिस्ट नसलेली केंद्रे तात्काळ बंद करा, परवाने रद्द करा, दोषींवर गुन्हे दाखल करा – अशी संतप्त मागणी होत आहे. ‘फ्लाइंग स्क्वॉड’ नेमुन धडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनो, जागे व्हा!
जास्त पैसे मागितले तर लगेच तक्रार करा, पावती घ्या – नाहीतर ही उघड लुट थांबणार नाही!

