प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
वर्धा
देशाची राजधानी दिल्ली येथे हादरवून सोडणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कडकडडुमा न्यायालयात न्यायाधीश म्हणुन कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले आहे. अमन कुमार शर्मा असे या मृत न्यायाधीशाचे नाव असुन, ते मूळचे पुण्याच्या नामांकित सिम्बायोसिस लॉ स्कुलचे माजी विद्यार्थी होते. या घटनेमुळे दिल्लीतील न्यायव्यवस्थेत आणि विधी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन कुमार शर्मा हे दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात वास्तव्यास होते. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातील स्नानगृहात (बाथरूम) त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब त्यांचे मेहुणे शिवम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अमन कुमार शर्मा हे अत्यंत हुशार आणि अभ्यासु न्यायाधीश म्हणुन ओळखले जात होते. २०१८ मध्ये त्यांनी पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कुलमधुन कायद्याची पदवी प्राप्त केली होती. १९ जुन २०२१ रोजी त्यांची दिल्ली न्यायिक सेवेत (Delhi Judicial Service) निवड झाली. दिल्ली न्यायिक सेवा परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश म्हणुन २०२१मध्ये रुजू झाले. ऑक्टोबर २०२५ पासुन कडकडडुमा न्यायालयात उत्तर-पुर्व जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे (DLSA) सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत होते.
एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्य असलेल्या तरुण न्यायाधीशाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजु शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस आता त्यांच्या कौटुंबिक वादातून किंवा कामाच्या तणावातुन हा प्रकार घडला का, या दिशेने तपास करत आहेत. त्यांचे सहकारी आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी, अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सध्या त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांशी संवाद साधुन यामागचे गुढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
उच्चशिक्षित आणि जबाबदार पदांवरील व्यक्तींमध्ये वाढणारे आत्महत्येचे प्रमाण ही चिंतेची बाब बनली आहे. कामाचा ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यावर वेळीच संवाद साधणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.आत्महत्या हा केवळ वैयक्तिक प्रश्न उरला नसुन तो एक गंभीर सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा विषय बनला आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये आणि अमन कुमार शर्मा यांच्यासारख्या उच्चशिक्षित, यशस्वी लोकांमध्ये वाढणारे हे प्रमाण खुप काही विचार करायला लावणारे आहे.
आजच्या काळात केवळ ‘यशस्वी’ होणे पुरेसे नाही, तर ‘सर्वात यशस्वी’ होण्याची चढाओढ लागली आहे. करिअर, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा टिकवुन ठेवण्याच्या दबावाखाली अनेकजण दबले जात आहेत. बाहेरून सर्व काही आलबेल दिसत असले तरी आतुन माणुस कोसळलेला असू शकतो हे अमन कुमार यांच्या उदाहरणावरून जाणवते.
यश, पद आणि प्रतिष्ठा असूनही मानसिक ताण किंवा वैयक्तिक संघर्ष माणसाला किती हतबल करू शकतो, याचे हे विदारक उदाहरण आहे. अशा वेळी ‘मानसिक आरोग्य’, या विषयावर गांभीर्याने बोलणे आणि एकमेकांना आधार देणे काळाची गरज बनली आहे.दिल्लीतील ही घटना खरंच अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी आहे. एका तरुण, उच्चशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे टोकाचा निर्णय घेणे, हे समाजासाठी आणि न्यायव्यवस्थेसाठी मोठे नुकसान आहे.
९५६१५९४३०६

