अल्पवयीन मुलीचा विवाह ऐनवेळी रोखला; कुटुंबीयांकडुन लेखी हमी
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह ऐनवेळी हाणुन पाडण्यात आला. विवाहाची तयारी पुर्ण झाली असतानाच पोलिसांनी धाड टाकुन हा बेकायदेशीर प्रकार रोखला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह अल्लीपुर येथील २७ वर्षीय युवकासोबत ठरवण्यात आला होता. विवाहासाठी मुलगी अल्लीपुर येथे दाखल झाली होती आणि बुधवारी सकाळी १० वाजता लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता.
दरम्यान, अल्लीपुरचे ठाणेदार विजयकुमार घुले यांना गुप्त माहिती मिळाली की एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात आहे. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिस पथकासह विवाहस्थळी धाड टाकली आणि लग्नाची प्रक्रिया थांबवली.
यानंतर महिला व बालविकास विभाग आणि चाइल्ड लाईनला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची जाणीव करून दिली. संबंधित कुटुंबीयांकडून लेखी जबाब घेण्यात आला असुन, पुढे अल्पवयीन मुलीचे लग्न करणार नसल्याची हमीही घेण्यात आली.
ही कारवाई ठाणेदार विजयकुमार घुले आणि बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात जमादार रवि वर्मा, जिल्हा समन्वयक आशीष मोडक, सोशल वर्कर शीतल घोडराव, संतोष ढोणे, वैभव भांदकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, माजी सरपंच नितीन चंदनखेडे तसेच अंगणवाडी व आशा सेविकांचा सहभाग होता.
पोलिस आणि प्रशासनाने नागरिकांना इशारा देत मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपुर्वी विवाह करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश दिला.

