घोराड : खापरी-शिवनगाव मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. काही वर्षांपुर्वी या रस्त्याचे केवळ दोन किलोमीटरपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र उर्वरित रस्ता अपुर्ण अवस्थेतच सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या दोन किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते, तो रस्तादेखील आता पुर्णपणे उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असुन चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत.
या मार्गावरून दररोज शेतकरी, मजुर व जनावरांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येबाबत लवकरच राज्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी व ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खापरी-शिवनगाव रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे, अशी आर्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

