वारा-पाऊस नसतानाही वारंवार बत्ती गुल, उकाड्याने चिमुकले व वृद्ध त्रस्त
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू परिसरात गेल्या काही दिवसांपासुन विजेच्या लपंडावामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. एकीकडे तापमान ४५° अंशाच्या वर वाढत असताना जिवाची लाही-लाही होत असताना विज पुरवठा वारंवार खंडित केला जातो,ही बाब नित्याची झाली आहे.कोणताही वारा किंवा पाऊस नसतानाही अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या बत्ती गुल प्रकारामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उकाड्याचा मोठा सामना करावा लागत आहे.
भरमसाठ वीजबिल भरूनही अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात वीज वितरण कंपनी पुर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडुन केला जात आहे. दिवसातुन अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच व्यावसायिकांचे व्यवहार विस्कळीत होत आहेत.
उन्हाच्या तिव्रतेत पंखे, कुलर आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना रात्री जागुन काढावी लागत आहे.
वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडुन केवळ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जात असुन कायमस्वरूपी उपाययोजना मात्र होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेलु परिसरातील नागरिकांनी तातडीने सुरळीत व अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

