विशेष प्रतिनिधी
ब्रम्हपुरी
“ज्याची जेवढी संख्या, त्याचा तेवढा वाटा” या लोकशाहीच्या सुत्राला बगल देऊन २०२६ च्या जनगणनेत ओबीसी (OBC) प्रवर्गाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप करत, ब्रम्हपुरी येथील ‘सकल ओबीसी महामोर्चा महिला आघाडी’ च्या वतीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा तिव्र इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देशाच्या प्रधानमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमुद केल्यानुसार, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची गणना केली जात आहे. या प्रश्नावलीतील प्रश्न क्र. १२ मध्ये घराचा प्रमुख कोणत्या समुदायाचा आहे, हे विचारले जात असताना त्यात केवळ सामान्य वर्ग (General), अनुसुचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) असेच पर्याय देण्यात आले आहेत. देशातील ६० टक्क्यांहुन अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाचा स्वतंत्र उल्लेख टाळल्याने समाजात तिव्र संताप व्यक्त होत आहे. “घराला जात नसते” असे संसदेत गृहमंत्र्यांनी म्हटले असताना, प्रत्यक्षात इतर प्रवर्गांची जात विचारली जात आहे; मग केवळ ओबीसींनाच ‘इतर’ (Others) मध्ये का ढकलले जात आहे? असा सवाल महिला आघाडीने उपस्थित केला आहे. जात विचारल्याशिवाय अचुक समुदाय निश्चित होऊ शकत नाही, हे स्पष्ट असताना ओबीसींना डावलणे हा घटनात्मक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि शैक्षणिक-आर्थिक नियोजनासाठी ‘इंपिरिकल डेटा’ (Empirical Data) अत्यंत आवश्यक आहे. जर जनगणनेच्या पहिल्या ३३ प्रश्नांमध्येच ओबीसींची नोंद झाली नाही, तर भविष्यात अचूक आकडेवारी कशी उपलब्ध होणार? या चुकीमुळे पुढची पिढी संविधानिक हक्कांपासून वंचित राहण्याची भीती महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जनगणनेच्या प्रश्नावलीत तातडीने सुधारणा करून ‘ओबीसी’ (OBC) साठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा. २०२६ ची जनगणना पुर्णपणे ‘जातिनिहाय’ पद्धतीनेच व्हावी. ओबीसींची अधिकृत लोकसंख्या जाहीर करून त्यानुसार धोरणात्मक नियोजन करावे. अश्या मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत ओबीसींचा स्वतंत्र रकाना अर्जात समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत जनगणना २०२७ वर पुर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल ओबीसी महामोर्चाने घेतला आहे.
केंद्र सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व सकल ओबीसी महामोर्चा महिला आघाडी, ब्रम्हपुरी च्या जयश्री कुथे, अल्का खोकले, वनिता ठाकूर, प्रतिभा भोयर, पिंकी राऊत, नयना आजबले, गीता ठाकरे, शितल नरूले, जया वंजारी, मंगला राऊत, व इतर कार्यकर्त्यांनी केले आहे.

