राजेश वरटकर
मुख्य संपादक
पुन्हा एकदा नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए म्हणजेच नॅशनलएजन्सीच्या कार्यपद्धतीवर व विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहे. नीट परीक्षेचे पेपर आतापर्यंत अनेकदा फुटल्याचे आरोप झाले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भविष्य ठरवणारी यंदाची (मे २०२६)नीट (NEET Exam) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडुन ३ मे रोजी घेण्यात आलेली मित्र परीक्षा (Exam) रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आलंय. आता, या पेपरफुटीचे धागेदोरे समोर आले असून नाशिकमधुन नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथुन पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने ३ मे २०२६ रोजी आयोजित केलेली NEET-UG २०२६ परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे आणि केंद्रीय संस्थांच्या तपासानंतर अधिकृतपणे रद्द केली आहे.
यापुर्वीच्या ८ वर्षांत १६ वेळा परीक्षा रद्द/पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे एन टी ए च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नीट पेपरफुटी ही एक गंभीर घटना आहे, ज्यामुळे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतो यातुन शिक्षण व्यवस्थेमध्ये संघटित गुन्हेगार कार्यरत असल्याचे दिसून येते, जे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालत आहेत. यामुळे मेहनती विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येऊ शकतात.
वारंवार पेपर फुटीच्या घटनांवरून दिसुन येते की राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या सुरक्षा प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी आहेत, ज्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्या.
यावरून हे हीं सुचित होते की संघटित गुन्हेगारी टोळ्या (प्रश्नपत्रिका फोडणारा माफिया) अनेकदा आर्थिक फायद्यासाठी परीक्षा प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहेत.प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे लाखो मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि नैराश्य निर्माण होते.यामुळे ‘समान संधी’ (सर्वांसाठी समान संधी) नष्ट होते, ज्यामुळे गैरमार्गांनी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.
वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.
पेपरफुटीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो कडे तपासाचीसोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे NTA च्या स्थापनेपासून अनेक मोठ्या परीक्षांमध्ये (NEET, UGC-NET) अनियमितता समोर आली आहे.परिणाम: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, मानसिक त्रास आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे NTA च्या व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण झाले आहेत.तंत्रज्ञान वापरूनही (GPS, AI) पेपर लीक होणे ही मोठी त्रुटी आहे.तंत्रज्ञानाचा इतका विकास होऊनही पेपर लीक होणे ही व्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी आणि चिंतेची बाब आहे.
तंत्रज्ञान कितीही प्रगत असले, तरी शेवटी यंत्रणा राबवणारी माणसे असतात. छपाई केंद्र, वाहतुक किंवा वितरण केंद्रावर जर एखाद्या व्यक्तीने गैरव्यवहार केला, तर तिथे तंत्रज्ञान हतबल ठरते. अनेकदा प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात साठवलेल्या असतात. हॅकर्स सर्व्हरवर हल्ला करून किंवा सुरक्षिततेतील त्रुटी शोधून पेपर चोरू शकतात. एआय (AI) आणि प्रगत साधनांचा वापर आता केवळ रोखण्यासाठीच नाही, तर गैरप्रकार करण्यासाठीही केला जात आहे. हाय-टेक गॅजेट्सचा वापर करून परीक्षा केंद्राबाहेरून उत्तरे मिळवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा कागदावर नियम कडक असतात, पण प्रत्यक्षात परीक्षा केंद्रांवर जॅमर्स किंवा सीसीटीव्ही योग्यरित्या काम करत नाहीत, ज्याचा फायदा गैरप्रकार करणारे घेतात.
याला जबाबदार कोण?
गेल्या ८ वर्षांत विविध परीक्षांच्या तांत्रिक अडचणी, पेपर फुटीचे आरोप किंवा परीक्षेच्या तारखांमधील बदलांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी NTA च्या कामकाजातील “संस्थात्मक अपयश” मान्य केले आहे, ज्यामुळे महासंचालकांना हटवण्यात आले आणि सुधारणांसाठी तज्ज्ञ समित्या स्थापन करण्यात आल्या.
या पेपरफुटीच्या घटनांमुळे गुणवान विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, प्रणालीमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
वर्षभर कठोर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि निराशेचे वातावरण निर्माण होते.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेत तयारी केली होती. परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत, तर काही जण पालकांसोबत विदेश दौऱ्यावरही गेले आहेत. मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थी विविध राज्यांतुन मोठ्या शहरांमध्ये येऊन कोचिंग क्लासेस घेत असतात. ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. काही विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.पेपरफोडणाऱ्याच्या स्वार्थासाठी लाखो विद्यार्थ्यांची अडीच वर्षांची तपश्चर्या मातीत मिसळते, तेव्हा केवळ परीक्षा रद्द होत नाही, तर एका संपुर्ण पिढीचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. ही आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याची व्यथा आहे. अडीच वर्षांचा एकांत आणि कठोर परिश्रम अनेक विद्यार्थ्यांनी अडीच वर्षांपासुन घर सोडलं नाही, साधा मोबाईल वापरला नाही की कोणत्याही सोशल मीडियावर गेले नाहीत. सण-उत्सव, लग्नकार्य आणि मित्रांसोबतचे आनंदाचे क्षण… या सर्वांवर पाणी सोडुन केवळ ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास केला. पण एका ‘पेपरफुटी’ने त्यांच्या या सर्व कष्टांची राखरांगोळी केली. पुन्हा शुन्यापासून सुरुवात कशी करायची?
केलेला अभ्यास पुन्हा करायचा?पुन्हा त्याच पुस्तकांसोबत, त्याच उत्साहात कसं बसायचं? हा प्रश्न आज प्रत्येक नीट (NEET) विद्यार्थ्याला छळतोय. पेपर फुटतातच कसे? आणि प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच का द्यायचे? हा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. विद्यार्थ्यांनी धीर सोडायला नाही पाहिजे.
विद्यार्थ्यांची वेदना मोठी आहे आणि त्यांचा राग रास्त आहे. पण त्यांचं ज्ञान आणि त्यांची जिद्द कोणीही चोरू शकत नाही. या कठीण काळात त्यांनी खचुन न जाता एकमेकांना आधार द्यायाला हवं. ही लढाई केवळ एका परीक्षेची नाही, तर मुलांच्या स्वप्नांच्या अस्तित्वाची आहे.
पेपर फुटीच्या वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे व परीक्षा रद्द झाल्यामुळे सरकार आणि पालक दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसतो.या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) विधेयक २०२४’ मंजूर केले असुन, त्यात कडक शिक्षेची तरतुद केली आहे. मात्र, केवळ कायदा असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी आणि तांत्रिक सुरक्षा अधिक मजबुत करणे ही काळाची गरज आहे
तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे; जोपर्यंत प्रशासकीय नैतिकता आणि कडक देखरेख एकत्र येत नाही, तोपर्यंत या त्रुटी पुर्णपणे दुर करणे कठीण आहे.
पेपरच्या वितरणासाठी ब्लॉकचेनचा वापर केल्यास प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राहु शकते. प्रश्नपत्रिकांच्या पेटीला स्मार्ट लॉक लावणे, जे केवळ परीक्षेच्या वेळेतच आणि विशिष्ट अधिकृत व्यक्तीच्या बायोमेट्रिक्सने उघडतील. तंत्रज्ञानासोबतच पेपर फोडणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा आणि मोठ्या दंडाची तरतुद असणे आवश्यक आहे.

