कोलगाव शिवारातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी
सेलु :
सेलु तालुक्यातील कोलगाव शिवारामधील कुवारा भिवसन देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर पुल बांधण्याचे काम मागील चार वर्षांपासून रखडले असुन, सदर काम तात्काळ मंजुर करून सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक रोशन राऊत तसेच शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, कोलगाव शिवारातील हा मार्ग नदीपात्रातुन जात असल्याने पावसाळ्याच्या काळात परिसरातील शेतकरी व मजुर वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नदीला पुर आल्यास शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालुन नदी पार करून शेतीची कामे करावी लागतात.
या पुलाच्या बांधकामासाठी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ६.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे काम रद्द करण्यात आले. त्यानंतर तब्बल चार वर्षे उलटुनही पुलाच्या कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
सदर पुलाच्या अभावामुळे कोलगाव शिवारातील सुमारे २६ ते २७ शेतकरी कुटुंबांचे जनजीवन प्रभावित होत आहे. शेतमाल बाजारपेठेत नेणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे यासारख्या मुलभुत गरजांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या पुलाच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी रोशन राऊत यांनी केली आहे.

