जो स्वतःला बुद्धिमान समजतो, तो या धोक्याकडे दुर्लक्ष करत असतो
तालुका प्रतिनिधी
सेलु
वर्धा जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील बोरधरन परिसरातील बोर व्याघ्र प्रकल्पात घडलेली एक घटना सध्या पर्यावरणप्रेमींसह वन्यजीव अभ्यासकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. जंगलाच्या गाभा क्षेत्रात एका कृत्रिम जलाशयाजवळ ठेवण्यात आलेली प्लास्टिकची बादली एका वाघाने तोंडात उचलुन दुर फेकल्याचा प्रकार पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर मानवी निष्काळजीपणामुळे जंगल आणि वन्यजीवांवर ओढवलेल्या संकटाचे भयावह वास्तव अधोरेखित करणारी आहे.
पर्यटनाच्या नावाखाली जंगल परिसरात वाढणारा प्लास्टिक कचरा आता थेट वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर घाला घालत आहे. प्लास्टिक फॉइल, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या आणि विविध प्रकारचा मानवी कचरा जंगलात फेकला जात असून त्याचा परिणाम मुक्या प्राण्यांना भोगावा लागत आहे. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या अधिवासात मानवी कचरा साफ करण्याची वेळ येणे, ही मानवजातीसाठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे.
विशेष म्हणजे, यापुर्वीही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘नयनतारा’ नावाच्या वाघिणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती पाण्यात तरंगणारी प्लास्टिकची बाटली तोंडाने बाहेर काढताना दिसली होती. या घटना वेगळ्या नसुन, जंगलात वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचा गंभीर इशारा आहेत.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, प्लास्टिकमुळे प्राण्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अनेक वेळा प्राणी प्लास्टिक गिळतात, ज्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला इजा होण्याची शक्यता असते. तसेच जलाशय, गवताळ क्षेत्र आणि जंगलातील परिसंस्थेवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत.
“आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कचरा जंगलात फेकतो आणि तोच कचरा हटवण्याची वेळ मुक्या प्राण्यांवर येते, हा निसर्गाचा नव्हे तर मानवाच्या बेजबाबदार वृत्तीचा पराभव आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पर्यटनस्थळांवर कठोर स्वच्छता नियम, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यटकांमध्ये जनजागृती करणे ही आता काळाची गरज बनली आहे. अन्यथा, प्लास्टिक प्रदूषणाचा हा मुक हल्ला भविष्यात संपुर्ण जंगल परिसंस्थेलाच उद्ध्वस्त करू शकतो.
