सेलू/प्रतिनिधी
वर्धा-नागपूर महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, याच निष्काळजीपणामुळे गुरुवारी कानापूर शिवारात एक भीषण दुचाकी अपघात घडला. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक रोशन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने दुरुस्ती व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दिनांक २१ मे रोजी दुपारी सुमारे ४वाजताच्या सुमारास सौ. अर्चना अनिल शंभरकर या दुचाकीने वर्धाहुन सेलुकडे जात असताना महामार्गावरील मोठ्या व असंतुलित खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. विधानसभा संघटक रोशन राऊत यांनी तत्काळ मदत करून त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले.
वर्धा-नागपुर हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग असुन अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुरुस्तीअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
रोशन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाची तातडीने पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच निष्काळजी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

