राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : सेलु पोलिसांनी हिंगणी शिवारातील बोर नदीकाठावर सुरू असलेल्या गावठी मोहादारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गुरुवारी (२१ मे) गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोहदा शिवारात छापा टाकला. महेश बंडेवार हा झाडाझुडपांच्या आडोशात मोठ्या प्रमाणावर मोहादारू गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी जंगलाच्या दिशेने फरार झाला.
पंचांसमक्ष पाहणी केली असता १२ लोखंडी ड्रममध्ये सुमारे २४०० लिटर मोहा सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, ड्रम, जर्मन पातेले, जळाऊ लाकुड व इतर साहित्य आढळुन आले. पोलिसांनी अंदाजे २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा तसेच २० हजार रुपयांचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या निर्देशानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक निरंजन वरभे, जमादार तुषार भुते, मंगेश राऊत व पोलीस शिपाई तुषार भोंबे यांनी पार पाडली.

