विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
गुंजेवाही (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपुर) येथे तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या १३ महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण हल्ल्यात कवडाबाई मोहुर्ले (४५), अनुबाई मोहुर्ले (४०), संगीता चौधरी (५०) आणि सुनिता मोहुर्ले (४०) या चार महिलांचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गुंजेवाही येथे भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. किरसान यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे सांगितले. मृतकांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत आवश्यक आर्थिक मदत मिळवुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली व याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपुर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत असुन, अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सुचनाही खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, माजी पंचायत समिती सभापती सिंदेवाही वीरेंद्र जयस्वाल, माजी सरपंच मुखरू वाडगुरे, माजी उपसरपंच गुंजेवाही परशुराम तोरे, आशिष भानारकर, चंद्रकांत मोहुरले, सोमेश्वर तोडासे, रोशन कोरेवार, बालू कोलते यांच्यासह परिवारातील इतर सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

