


राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : तालुक्यात गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली, विजेचे खांब कोसळले, घरांवरील तसेच शेतशिवारातील गोठ्यांवरील टिनपत्रे उडाली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
सेलू ते घोराड मार्गावरील सागाचे मोठे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. घोराड येथील सोनिया नगर परिसरात आशिष नवघरे यांच्या घरावरील लोखंडी पलंग वाऱ्याच्या जोरावर उडुन थेट विजेच्या खांबावर अडकला. त्यामुळे विजतारा तुटुन परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, सेलु पोलीस स्टेशनसमोरील विजेच्या रोहित्रावर झाड कोसळल्याने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा काही काळासाठी बंद पडला. अनेक भागात विजेचे खांब उन्मळून पडल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
घोराड येथील शेतकरी देवराव राऊत यांच्या शेतातील झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीपैकी एका बैलाचा मृत्यु झाला. विज पडल्याने हा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वादळी वाऱ्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायालाही बसला. घोराड येथील शरद वरटकर यांच्या पोल्ट्री फार्म हाऊसची भिंत कोसळल्याने तब्बल ३०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याशिवाय सेलु येथील आठवडी बाजार परिसरातील सुमारे दोनशे वर्षे जुने पिंपळाचे विशाल झाड एका कारवर उन्मळुन पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
पहिल्याच पावसात झालेल्या या नुकसानीमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची धावपळ उडाली असुन नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

