मंगेश तडस
समुद्रपुर प्रतिनिधी
समुद्रपुर : अधिक मासानिमित्त वणा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या बाप-लेकीसह एका अल्पवयीन मुलीचा बुडुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी समुद्रपुर तालुक्यातील मांडगाव येथील वणा नदीपात्रात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजदा शेडगाव येथील अतुल लक्ष्मण किणकर (वय ४५) हे शुक्रवारी सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान आपली होंडा शाईन दुचाकी क्रमांक एमएच ३२ एएल ६५३९ ने मुलगी कु. रिधिमा अतुल किणकर (वय १५) व तिची मैत्रीण कु. गुंजन रमेश मेश्राम यांच्यासोबत मांडगाव येथील वणा नदीपात्रावर आंघोळीसाठी गेले होते.
नदीकाठावर दुचाकी व कपडे ठेवुन तिघेही नदीपात्रात उतरले. मात्र नदीपात्रात अवैध रेती उत्खननामुळे पडलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी नदीपात्रावर जाऊन पाहणी केली असता दुचाकी व कपडे दिसुन आले. त्यानंतर ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट व समुद्रपूर पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर तिघांचेही मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे किणकर व मेश्राम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
