राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असण्याची सक्ती हा सध्या महाराष्ट्रातील हजारो अप्रमाणित आणि जुन्या शिक्षकांसाठी अत्यंत चिंतेचा आणि कळीचा मुद्दा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२६ मध्ये दिलेल्या ताज्या निर्णयानुसार, सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी सर्व कार्यरत शिक्षकांना ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत TET उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड धास्ती आणि असंतोष निर्माण झाला असून, ‘टीईटीचे भुत शिक्षकांच्या मानगुटीवर’ बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेली २ वर्षांची मुदत वाढवुन आता ३१ ऑगस्ट २०२८ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.दिलेल्या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती किंवा थेट नोकरी गमवावी लागेल.
शिक्षक हक्क कायदा २००९ अस्तित्वात येण्याआधी भारतात प्राथमिक शाळांसाठी डी.टी.एड. (D.T.Ed./D.Ed.) आणि उच्च प्राथमिक ते माध्यमिक शाळांसाठी बी.एड. (B.Ed.) हीच शिक्षक नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता होती.त्यावेळी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET/CTET) उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते
शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये अस्तित्वात आला.२००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे,मात्र २००९ पुर्वी नियुक्त शिक्षकांना टी ई टी अनिवार्य का करण्यात आली, हे न समजण्यापलीकडेचे आहे.
२००९ च्या आधी नियुक्त करण्यात आलेल्या
शिक्षकांना टीईटी (TET) मधुन वगळण्याची मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केलेली आहे,कारणही रास्त आहे .नियुक्तीच्या वेळी टी टी ई टी अनिवार्य नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २००९ पुर्वी नियुक्त झालेल्या सर्व कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्षांपेक्षा कमी उरली आहे, त्यांनाच यातून सवलत देण्यात आली आहे.मात्र, पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्षांपेक्षा अधिक बाकी आहे, त्यांना परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मुदत संपल्यानंतरही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी गमवावी लागू शकते किंवा सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवल्याने, अनेक शिक्षक संभ्रमात आहेत, खासकरून सीटीईटी उत्तीर्ण असलेल्यांमध्ये. ‘टीईटी’ अनिवार्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर अनिश्चिततेचे सावट आहे.
एका अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांच्या याचिकेबाबत निकाल देताना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यभरातील टीईटी पात्र नसलेल्या अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. तसेच राज्यातील काही शिक्षक टीईटी पात्र नसले, तरी ते सीटीईटी पात्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे शिक्षकही संभ्रमात असुन, आता पुन्हा टीईटी द्यावी लागणार का?, असा प्रश्नही त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे.
राज्य सरकारने १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील अनेक शिक्षकांमध्ये अस्वस्थता असुन, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या भुमिकेकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विविध शासन निर्णय (दि. १३.२.२०१३, ३०.६.२०१६, ३१.०१.२०१८, ०७.०२.२०१९, ३०.०६.२०२२, २५.१०.२०२३) यावर अधोरेखित करतात की पुर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टी ई टी अनिवार्य नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार, टी ई टी नसल्यामुळे पदोन्नती नाकारणे, स्वेच्छा निवृत्ती भाग पाडणे किंवा सेवा समाप्त करणे योग्य नाही आणि हे शिक्षकांच्या कौटुंबिक जीवनावर तसेच समाजावर गंभीर परिणाम करू शकते.
अनेक शिक्षक गेल्या २०-२५ वर्षांपासुन अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अशा कोणत्याही पात्रता परीक्षेची अट नव्हती, त्यामुळे आता वयाच्या उत्तरार्धात परीक्षा घेणे अन्यायकारक आहे.
महाराष्ट्रात आजवर झालेल्या MAHA TET परीक्षांचा निकाल सरासरी ५% ते ११% च्या आसपास लागला आहे. इतक्या कठीण काठिण्यपातळीमुळे अनुभवी शिक्षकांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची भीती वाटत आहे.हा नियम केवळ जिल्हा परिषद शाळांनाच नव्हे, तर राज्यातील सर्व खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना लागु करण्यात आला आहे. यापूर्वी टीईटी घोटाळ्यात किंवा अपात्र ठरलेल्या अनेक शिक्षकांचे पगार शिक्षण विभागाने रोखले होते, ज्यामुळे शिक्षकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे.
