शिवशाही न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले असताना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नागपुर ते पोहरादेवी हेलिकॉप्टर दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. इंधन बचतीच्या संदेशाच्या पार्श्वभुमीवर मंत्र्यांचा हेलिकॉप्टर प्रवास आणि त्यासाठी झालेल्या व्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मंत्री राठोड यांनी पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेल्या बंजारा विरासत संग्रहालयासह विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने भेट दिली. स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा वाहनताफा तैनात करण्यात आला होता. या ताफ्यात शासकीय तसेच खासगी वाहनांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
पोहरादेवी येथील कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर मंत्री राठोड पुढील दौऱ्यासाठी यवतमाळकडेही हेलिकॉप्टरने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. या संपुर्ण दौऱ्यावरून सामाजिक माध्यमांवर तसेच विरोधी पक्षांकडून खर्च आणि इंधन वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र, या दौऱ्याचा अधिकृत खर्च, हेलिकॉप्टर वापराचा तपशील किंवा त्यामागील प्रशासकीय कारणे याबाबत शासन अथवा संबंधित विभागाकडुन अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर वापरण्याची आवश्यकता आणि सार्वजनिक निधीवरील खर्च याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मंत्र्यांच्या दौऱ्यांमध्ये वेळेचे व्यवस्थापन, सुरक्षा आणि प्रशासकीय गरजा महत्त्वाच्या असतात. मात्र, सार्वजनिक खर्चाबाबत पारदर्शकता राखणेही तितकेच आवश्यक असल्याने या दौऱ्याबाबत शासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इंधन बचतीचा संदेश आणि प्रत्यक्षातील सरकारी दौऱ्यांमधील खर्च यातील तफावत हा मुद्दा आगामी काळात राजकीय चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
