राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभणे यांची नागपूर येथील गुप्त वार्ता विभागात बदली करण्यात आली असुन त्यांच्या जागी सावंगी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघोडे हे सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळी सेलु पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत.
मनोज गभणे यांनी अवघ्या महिनाभरापुर्वीच सेलु पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला होता. अल्प कालावधीत त्यांनी परिसरातील अवैध धंदे, गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत काही प्रमाणात वचक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने पोलिस वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गभणे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी सावंगी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघोडे यांनी यापुर्वी विविध ठिकाणी सेवा बजावत प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्था हाताळण्याचा अनुभव मिळवला आहे.
दरम्यान, नव्या ठाणेदारांकडून सेलु शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाईची अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे. गभणे यांच्या अचानक झालेल्या बदलीची चर्चा मात्र शहरात आणि पोलिस विभागात सुरू आहे.
