सेलू : बोर जलाशयातील स्थानिक मच्छीमार कामगारांना कमी मजुरी देऊन बाहेरगावच्या कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत बहुजन समाज पक्षाने विकास चौकातुन भर उन्हात मोर्चा काढला व तहसिल कार्यालयात जाऊन तहसीलदार शकुंतला पराजे यांना निवेदन सादर केले .यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.सुनिल डोंगरे, जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.
निवेदनानुसार, बोर धरण परिसरातील अनेक मच्छीमार कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासुन जलाशयात मासेमारीचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. पुर्वीच्या ठेकेदाराकडे काम करताना मच्छीमारांना प्रति किलो ५० रुपये मजुरी मिळत होती. मात्र नवीन ठेकेदाराने मजुरीचे दर कमी केल्याने स्थानिक मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
स्थानिक मच्छीमारांनी पुर्वीप्रमाणे मजुरी देण्याची वारंवार मागणी केली, मात्र ठेकेदाराने ती फेटाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जुन्या कामगारांना कामावरून दुर करून बाहेरगावाहुन कामगार आणण्यात आल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत मच्छीमारांनी व्यक्त केली.
महागाई दिवसेंदिवस वाढत असताना मजुरीचे दर वाढण्याऐवजी कमी करण्यात येत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठेकेदाराकडुन किमान वेतन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
बोर जलाशयातील स्थानिक मच्छीमारांना पुर्वीच्या दराने किंवा त्याहुन अधिक दराने काम द्यावे, तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे.याप्रसंगी विधानसभा प्रभारी राजेश चन्ने,अरुण शंभरकर, महासचिव विशाल रंगारी,BVF जिल्हा संयोजक सिद्धार्थ ढेपे, संयोजक शंकर पाणबुडे, मधुकर सोनकवळे, अनिता पारिसे,शहर अध्यक्ष आकाश म्हैसकर यांच्या सह पक्षाचे कार्यकर्ते तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागणी मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
