राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : आगामी राष्ट्रीय जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी स्वतंत्र रकाना (Box) उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सेलु ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशात लवकरच राष्ट्रीय जनगणना प्रक्रिया होणार असुन सध्या जनगणनेच्या अर्जामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसुचित जमाती (ST) यांच्याप्रमाणे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना उपलब्ध नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या नोंदवली जात नसल्याने या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचे वास्तव चित्र समोर येत नाही.
देशाच्या विकासात ओबीसी समाजाचे योगदान मोठे असुनही अचुक आकडेवारीच्या अभावामुळे विविध शासकीय योजना, शैक्षणिक सवलती व विकासाच्या संधींपासुन समाज वंचित राहत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देऊन जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट, सवलती व विकास योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओबीसी समाजाची अचुक गणना होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. या निवेदनावर वर्धा विधानसभा अध्यक्ष गणेश खोपडे,पंढरी जुगनाके, प्रमोद ढुमणे, भाऊराव सरोकार, काशिनाथ लोणकर, सुंदरलाल शिंदे, वसंतराव तेलरांधे, दिनेश माहुरे, देवराव राऊत,बंडु मुंगभाते अक्षय महाकाळकर,सुहाणी लाखे यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे.या विषयात केंद्र सरकार व जनगणना आयोगाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी सेलु ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
