शेगाव, प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे यंदा ५७ वे वर्ष असुन, २१ जुन रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथुन पालखी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान करणार आहे. हरीनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघणाऱ्या या सोहळ्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ्यात सुमारे ७०० वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि भाविक सहभागी होणार आहेत. “जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल” च्या अखंड जयघोषात संतनगरी शेगाव ते पंढरपुर असा सुमारे ३३ दिवसांचा पदयात्रेचा प्रवास पार पडणार आहे.
पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपुर येथे दाखल होणार असुन आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होईल. या कालावधीत अकोला, रिसोड, सेनगाव, औंढा नागनाथ, परभणी, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापुर, सोलापुर आणि मंगळवेढा यांसह अनेक धार्मिक स्थळांवर पालखीचे स्वागत व मुक्काम होणार आहेत.
वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणारी ही वारी केवळ धार्मिक परंपरा नसुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत २१ जुन रोजी शेगावातुन निघणारा हा सोहळा पुन्हा एकदा भक्तिरसात संपुर्ण परिसर न्हाऊन काढणार आहे.
विशेष : पंढरपुर येथे मुक्काम पुर्ण करून २९ जुलै रोजी परतीचा प्रवास सुरू होणार असुन १९ ऑगस्ट २०२६ रोजी पालखी पुन्हा संतनगरी शेगाव येथे परतणार आहे.

