शेगाव बु. येथे अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; विविध कलमांखाली गुन्हा दाखल
बोगस बियाण्याचे कनेक्शन सेलु तालुक्यात
उत्पादकाचे नाव नसल्याने संशय; कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई
अजय कुमार गांजरे
तालुका प्रतिनिधी/वरोरा
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे अनधिकृत व संशयास्पद कापूस बियाण्यांचा साठा आढळुन आल्याने कृषी विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत तब्बल ८६ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध शेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान एकुण १६६ पॉकेट हायब्रीड कापुस बियाणे जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान सदर बियाण्यांचा पुरवठा वर्धा जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील जितु टेकाडे रा.घोराड यांच्याकडुन खरेदी केल्याची माहिती आरोपी मितेश पारोधे यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांच्या पॅकेटवर उत्पादकाचे नाव नमुद नसल्याचे आढळुन आले. तसेच आवश्यक परवाना नसताना कापुस बियाण्यांची साठवणुक व विक्री करण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले. यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी शेगाव पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरू केला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत व प्रमाणित बियाणेच खरेदी करण्याचे आवाहन केले असून, अवैध बियाण्यांच्या विक्रीवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असुन, कृषी विभागाच्या पुढील तपासाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

