राजेश वरटकर
मुख्य संपादक
घोराड : वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून वर्धा जिल्ह्यात यंदा तापमानाने तब्बल ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले व वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभुमीवर सेलु तालुक्यातील श्री क्षेत्र घोराड येथील प्रेमनगर क्रीडा मंडळाच्या तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.
अधिक महिन्याचे औचित्य व संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावर मंडळाच्या सदस्यांनी घोराड येथील श्री संत नामदेव महाराज समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच गंगामाई मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड केली. या उपक्रमातुन पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करत भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संकल्प करण्यात आला.
या वृक्षारोपण मोहिमेत ज्येष्ठ नागरिक रामाजी भांदककर यांच्यासह पराग वैरागडे, अमोल (बंटी) माहुरे, शुभम खराबे, गणेश माहुरे, विजय रहांगडाले आणि बादल वर्मा, सुरज रामटेके, सर्पमित्र प्रदिप वैरागडे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वैरागडे यांनी अथक परिश्रम घेतले. तरुणांनी स्वयंस्फुर्तीने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केला.
पर्यावरण रक्षणासाठी तरुणांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

