राजेश वरटकर
मुख्य संपादक
जीवन विकास विद्यालय, उमरेड येथुन बारावी उत्तीर्ण झालेली १८ वर्षीय प्राची श्यामकुमार वाघमारे हिने आपल्या चित्रकलेच्या आवडीला व्यवसायाचे रूप देत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्राचीचा कला प्रवास लॉकडाऊनच्या काळात सुरू झाला. सुरुवातीला चित्रकला हा केवळ वेळ घालवण्याचा आणि आवडीचा छंद होता. मात्र, या छंदानेच पुढे तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली तिच्या या अलौकीक यशामागे आई आणि वडिलांनी तिची खुप मदत केली. अक्रालिक रंगांच्या साहाय्याने कॅनव्हासवर आकर्षक चित्रे साकारण्याची तिला विशेष आवड असुन सातत्यपुर्ण सराव, मेहनत आणि कलाप्रेमाच्या बळावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चित्रकलेप्रती असलेल्या समर्पणामुळे प्राचीने आजवर विविध ऑनलाइन माध्यमांतुन १८० हून अधिक चित्रांची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, तिच्या कलाकृतींना देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी पसंती मिळाली आहे.
प्राचीची चित्रे फ्रान्समधील पॅरिस, जर्मनी आणि थायलंड यांसारख्या देशांतील कला रसिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहेत. ग्रामीण भागातील एका तरुणीने आपल्या कलेच्या बळावर जागतिक स्तरावर ओळख निर्माण केल्याने परिसरातुन तिचे कौतुक होत आहे.
कलेवरील निष्ठा, जिद्द आणि सातत्यपुर्ण प्रयत्न यांच्या जोरावर प्राची वाघमारेने अनेक तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असुन, छंदाला व्यवसायात रूपांतरित करून यश मिळविण्याचा मार्गही दाखवुन दिला आहे.

