शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा-चंद्रपुर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महाविकास आघाडी व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह त्यांची हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश अग्रवाल यांनी स्वतःच्या विनंतीवरून काँग्रेसकडुन उमेदवारी मिळविली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पक्ष नेतृत्व व स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेसची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी निलंबनाचे पत्र जारी केले. पत्रात शैलेश अग्रवाल यांनी पक्षाला अडचणीत आणणारे व शिस्तभंगाचे कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.
या कारवाईच्या प्रती वर्धा, चंद्रपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस समित्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच माघार घेतल्याने निर्माण झालेला राजकीय पेच आणि त्यानंतर झालेली पक्षाची कठोर कारवाई विदर्भातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील समीकरणे बदलली असुन महायुतीला मोठा फायदा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

