विशेष प्रतिनिधी
पुणे
पुण्यातील लोणीकंद परिसरात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत धाड टाकली. या कारवाईदरम्यान १०० हुन अधिक तरुण-तरुणी उपस्थित आढळून आले. विशेष म्हणजे, या पार्टीत २१ वर्षांखालील युवक-युवतींचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आयोजकांनी दि.६जुन दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत संबंधित पार्टीसाठी परवानगी घेतली होती मात्र दिलेली वेळ संपुनही रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु असल्याचे माहिती आहे.देण्यात आलेली परवानगीची वेळ संपल्यानंतरही कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकुन कारवाई केली, यावेळी तिथे महागड्या विदेशी दारू च्या बाटल्या तसेच तंबाखुजन्य पदार्थ आढळुन आले असुन पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी उपस्थितांची चौकशी सुरू केली असुन आयोजकांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित बंगल्याचा वापर पार्टीसाठी कोणी उपलब्ध करून दिला, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच मद्य व इतर प्रतिबंधित पदार्थांचा वापर झाला होता त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलिसांकडुन सुरू आहे.
या कारवाईमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असुन, अल्पवयीन आणि तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अशा पार्ट्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

