राजेश वरटकर
मुख्य संपादक
देशभरात वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. जीवनावश्यक वस्तुंपासुन पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस, शिक्षण, आरोग्य आणि वीजबिलांपर्यंत सर्वच खर्च गगनाला भिडल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. घर चालवायचे की मुलांचे शिक्षण करायचे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.
एकीकडे शेतकरी वाढत्या खत-बियाण्यांच्या किमती, कर्जाचा बोजा आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही रोजच्या खर्चासाठी काटकसर करावी लागत आहे. महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे.
कर्जमाफीच्या घोषणा आणि मदतीच्या आश्वासनांचा गाजावाजा होत असला तरी प्रत्यक्षात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबांनी अनावश्यक नव्हे तर आवश्यक खर्चांवरही कात्री लावण्यास सुरुवात केली आहे.
महागाईचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसत असुन त्यांच्या जगण्याचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाढती महागाई ही आता केवळ आर्थिक समस्या नसुन सर्वसामान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे.
: *गॅस सिलेंडर महाग
*पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम
* शेतकरी कर्जाच्या विळख्यात
*मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले
*महागाईवर नियंत्रणाची नागरिकांची मागणी

