विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर घुग्घुस शहरालगतच्या माथारदेवी परिसरातील वर्धा नदीने मंगळवारी पाच तरुणांना आपल्या विळख्यात घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असुन, आज सकाळी सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेत एका युवकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित चार युवकांचा शोध अद्याप सुरू आहे.
सम्यक देवराव सोनटक्के (१८), संनी अशोक आस्मपेल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९), शिव भास्कर केलझरकर (१९) आणि तन्मय नवनाथ पथाडे (१८) अशी बेपत्ता युवकांची नावे असुन ते सर्व घुग्घुस येथील इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहेत.
हे पाचही मित्र वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नदीकाठी त्यांचे कपडे व मोबाईल आढळुन आल्याने बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.
आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र उर्वरित चार युवकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि खोली यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण घुग्घुस शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एकाच वेळी पाच तरुण मित्रांवर आलेल्या या संकटामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडुन युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असुन नागरिकांचे लक्ष आता उर्वरित चार युवकांच्या शोधाकडे लागले आहे.
“पोहण्याचा आनंद ठरला काळाचा घाला”
उन्हाच्या तीव्रतेपासुन दिलासा मिळवण्यासाठी नदीत उतरलेले पाच मित्र क्षणार्धात संकटात सापडले. या घटनेने नदीकाठच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

