बाहेरगावाहुन परतल्यानंतर टोकाचे पाऊल; कारण अद्याप अस्पष्ट
सेलु(प्रतिनिधी): सेलु तालुक्यातील घोराड परिसरात एका ३८ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. विशेष म्हणजे, ही घटना घडताना त्यांचा आठ वर्षीय मुलगा घटनास्थळी उपस्थित असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया नगर येथील रहिवासी लक्ष्मण उर्फ लक्ष्या अजाब पंधराम (वय ३८) यांनी बोरनदी तिरावरील बेंतल बुवा परिसरात आत्महत्या केली. ते आजच बाहेरगावाहुन परतले होते. सायंकाळी ते आपल्या आठ वर्षीय मुलाला सोबत घेऊन त्या परिसरात गेले होते.
दरम्यान, त्यांनी अचानक झाडाला गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. ही घटना पाहुन घाबरलेल्या मुलाने रडत घरी धाव घेत आईला याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय व शेजारी घटनास्थळी पोहोचले असता सदर प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती पोलीस पाटील निलेश गुजरकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सेलु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन पोलिसांकडुन विविध अंगांनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे घोराड व परिसरात शोककळा पसरली आहे.

