वेळ निघुन चालली, आभाळ मात्र कोरडे; उत्पादन घटण्याची भीती
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु तालुक्यासह परिसरात मृग नक्षत्र सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षी मृग नक्षत्रात पेरणीला सुरुवात करणारे शेतकरी यंदा आकाशाकडे डोळे लावुन बसले असुन पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुन महिन्याचा पहिला आठवडा उलटुन गेला तरी पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
कापुस, सोयाबीन, तुर, मुग, उडीद यांसारख्या प्रमुख पिकांच्या पेरण्या वेळेत न झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उशिरा होणाऱ्या पेरण्यांमुळे उत्पादन खर्च वाढण्यासोबतच उत्पन्न घटण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीची सर्व तयारी पुर्ण केली असली तरी पावसाअभावी शेतात पेरणीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.
पावसाच्या विलंबामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता असुन, आता सर्वांचे लक्ष आगामी काही दिवसांतील हवामानाकडे लागले आहे. लवकरच चांगला पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येईल, अन्यथा खरिपा हंगामासमोर मोठे संकट उभे राहु शकते.

