महामार्गांवरून लाखो रुपयांचे इंधन गायब; चोरीच्या तेलाचा काळाबाजार फोफावला
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा;जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासुन पेट्रोल आणि डिझेल चोरी करणाऱ्या संघटित टोळ्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला असुन आता या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. महामार्गांवर उभ्या असलेल्या ट्रक, कंटेनर आणि टँकरमधुन मोठ्या प्रमाणात इंधन चोरी करून त्याचा साठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही गुन्हेगार अत्याधुनिक साधनांचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत शेकडो लिटर पेट्रोल व डिझेल ढाब्यावर उतरवुन काळाबाजार करीत विक्री करून कमी वेळात”गब्बर”होत असल्याने अनेक बेरोजगार युवक यांत गुंतले असताना प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. चोरीचे इंधन कमी दरात विकुन काळाबाजार चालविला जात असल्याने शासनाचा महसुल बुडत असुन वाहनधारक आणि वाहतुक व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
या वाढत्या प्रकारांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला आहे. संशयित ठिकाणांवर रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने टोळ्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. काही संशयितांची माहितीही पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
पोलिस विभागाने स्पष्ट संकेत दिले आहेत की चोरीचे पेट्रोल-डिझेल खरेदी करणारे, साठवणुक करणारे आणि विक्री करणारे यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या संपुर्ण साखळीवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी पेट्रोल-डिझेल चोरीबाबत कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

