*’श्रीराम सिटी’च्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लुट
*रेरा (RERA) परवानगी आणि इतर तांत्रिक मंजुरींशिवाय बुकिंगचा घाट
*रस्त्याचा पत्ता नाही, तरीही ग्राहकांकडून लाखो रुपयांची उकळणी
*प्रशासनाची डोळेझाक; कारवाई कधी होणार?
दिनेश घोडमारे
सिंदी (रेल्वे) : एकीकडे सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाच्या पैशातुन हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे काही बिल्डर्स शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन जनतेची लुट करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सिंदी (रेल्वे) येथील ‘श्रीराम सिटी’ या तथाकथित ले-आऊटच्या माध्यमातुन नागरिकांची मोठी फसवणुक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
‘श्रीहरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या नावाने परिसरात मोठ्या जाहिराती लावून सिंदी (रेल्वे) येथे ‘श्रीराम सिटी’ या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या ले-आऊटबाबतची अधिकृत माहिती घेतली असता, केवळ जमिनीचा एन.ए. (N.A.) आदेश असल्याचे समोर आले आहे. मात्र, केवळ एन.ए. असुन चालत नाही, तर ले-आऊटसाठी आवश्यक असणारी नगररचना विभागाची (Town Planning) अंतिम मंजुरी, तहसीलदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि ‘रेरा’ (RERA) नोंदणी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर परवानग्या बिल्डर्सनी घेतलेल्या नाहीत. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नियमावलीनुसार, कोणताही गृहप्रकल्प किंवा ले-आऊट विक्रीसाठी उपलब्ध करण्यापुर्वी रेराकडे नोंदणी करणे बंधनकारक असताना, या प्रकल्पाची कोणतीही नोंदणी नसतानाही ग्राहकांना भुलथापा देऊन जमिनीची विक्री केली जात आहे. या संपुर्ण फसवणुकीच्या मागे ‘श्रीहरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे मालक हरी शेंडे आणि शाम उपासे राहणार हिंगणघाट हे मुख्य सुत्रधार असल्याचे समोर येत आहे.
या अनधिकृत ले-आऊटच्या तांत्रिक बाजुंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सदर ले-आऊट पिपरा मायनर कालव्याला अगदी लागुन आहे. नियमानुसार, कालव्याच्या लगतच्या जमिनीबाबत विशेष कायदेशीर तरतुदी असतात. धक्कादायक म्हणजे, या ले-आऊटला कोणताही अधिकृत रस्ता उपलब्ध नाही. बिल्डर्सने केवळ पिपरा मायनर कालव्याच्या बांधाला लागुन असलेल्या जागेचा वापर करून, त्याच मार्गावरून ले-आऊटचा रस्ता दाखवला आहे. वास्तविक पाहता, हा रस्ता बेकायदेशीर असून, रहदारीसाठी सुरक्षित किंवा कायदेशीर नाही. ग्राहकांना अंधारात ठेवुन अशा प्रकारे दिशाभुल करणारे रस्ते दाखवून प्लॉट विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
यापूर्वी हिंगणघाट येथील कामडी बिल्डर्सने ‘नंदी टाऊन’च्या नावाने अशाच प्रकारे कोणतीही मंजुरी नसताना नागरिकांची करोडोंची फसवणुक केली होती. त्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही, १० वर्षे उलटुन गेल्यानंतरही तेथील रहिवाशांना ना मुलभुत सोयी-सुविधा मिळाल्या, ना त्यांची घरे कायदेशीर झाली. आज सिंदी (रेल्वे) येथील नागरिकही हरी शेंडे आणि शाम उपासे यांच्या ‘श्रीराम सिटी’च्या माध्यमातुन त्याच फसवणुकीच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.
प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी
केवळ एन.ए.च्या नावाखाली इतर कायदेशीर परवानग्यांचा अभाव असताना सर्रास प्लॉट विक्री करणाऱ्या या बिल्डर्सवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडुन होत आहे. या ले-आऊटमधील दिशाभुल करणाऱ्या जाहिराती त्वरित बंद करून ग्राहकांना फसवणुकीपासुन वाचवणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात त्वरित लक्ष घालुन या अनधिकृत व्यवहारांना चाप लावावा, अन्यथा भविष्यात अनेक सामान्य कुटुंबांची आयुष्यभराची कमाई धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

