कर्जबाजारीपणा, सावकारांचा तगादा आणि आर्थिक विवंचनेतुन शेतकरी हतबल; २४ कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यावर्षी केवळ पाच महिन्यांत तब्बल ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असुन, त्यामुळे कृषी क्षेत्रातील गंभीर संकट पुन्हा ऐरणीवर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आत्महत्येच्या ५५ प्रकरणांपैकी २४ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. मात्र उर्वरित कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा असल्याने शेतकरी कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सततचे नापिकीचे चक्र, वाढते उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, बँका व खासगी सावकारांचा तगादा आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असुन, केवळ आर्थिक मदत नव्हे तर शाश्वत कृषी धोरण, कर्जमुक्ती आणि हमीभावाच्या प्रभावी उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.
शेतकरी आत्महत्या चा धक्कादायक आकडा
५ महिन्यांत आत्महत्या : ५५
मदतीसाठी पात्र प्रकरणे : २४
अनेक कुटुंबे अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत
“शेतकऱ्यांच्या मृत्युची ही आकडेवारी नसुन ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीची वेदनादायक कहाणी आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनांकडुन व्यक्त केली जात आहे.

