नागपुर, वर्धा, ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; पुढील २४ तास उष्णतेच्या लाटेचा इशारा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
राज्यातील अनेक भागांत मान्सुनच्या आगमनाची प्रतीक्षा लांबत असताना विदर्भ मात्र प्रचंड उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहे. नागपुर, वर्धा आणि ब्रह्मपुरी येथे तापमानाने ४४ अंशांचा टप्पा ओलांडला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
नागपुरमध्ये तापमान ४४ अंशांवर पोहोचले असुन ते सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक आहे. ब्रह्मपुरीत ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली असुन ते सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी जास्त आहे. वर्धा जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांपैकी एक ठरला असुन येथे ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
पश्चिम विदर्भातही उष्णतेचा तडाखा कायम आहे. अमरावतीमध्ये ४२.८ अंश, अकोल्यात ४३.४ अंश, तर यवतमाळमध्ये ४३.२ अंश तापमान नोंदविण्यात आले. या सर्व शहरांतील तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशांनी अधिक असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मान्सुनच्या आगमनाकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले असताना वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाई, वीज वापर आणि आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर बनत आहेत. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागपुर, वर्धा, ब्रह्मपुरीत ४४ अंशांपेक्षा अधिक तापमान
वर्धा ४४.५ अंशांसह राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक
पुढील २४ तास उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता
मान्सुनच्या विलंबामुळे शेतकरी चिंतेत
उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
“पावसाची प्रतीक्षा वाढत असताना विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या ज्वाळांचा सामना करावा लागत आहे.”

